हवामान बदल आणि शेती |
हवामान बदलामुळे जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवर कृषी, अन्नपुरवठा व अन्नसुरक्षा यावर अलीकडील काळात विपरीत परिणाम दिसून येत आहेत. तापमानात होणारी वाढ, मॉन्सून च्या आगमनात झालेले बदल, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ या सर्व गोष्टींचा परिणाम शेतीवर प्रकर्षाने जाणवत आहे. यावर्षी २०२२ च्या एप्रिल महिन्यात झालेल्या गारपिटीने द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याबरोबर इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
मागील काही दिवसांमध्ये कृषी मंत्रालयाकडून आलेल्या माहितीनुसार गहु उत्पादनामध्ये ३ % ची घट झाली आहे. व ही उत्पादन घट २०१४ - १५ नंतरची पहिली घट आहे व या उत्पादनातील घटीसाठी उष्ण हवामान जबाबदार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या वर्षीच्या उन्हाळ्यात विदर्भाचा संत्रा उत्पादक भाग ही अचानक झालेल्या तापमान वाढीमुळे संकटात सापडला, या भागातील तापमान हे ४५ ℃ च्या वर पोहचल्यामुळे शेतकऱ्यांनी धरलेल्या अंबिया बहराची फळे मोठ्या प्रमाणात गळाली त्यामुळे या भागातील संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत आहे. तर दुसरीकडे अकोला जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे वाढत्या तापमानामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाढत्या तापमानामुळे केळीच्या वजनात ५ ते ६ किलोने घट आली आहे. शिवाय वादळी वारे आणि गारपिटीने ही केळी बागांचे मोठ्या प्रमाणात यावर्षी नुकसान झाले आहे.
हवामान बदलाचा फटका केवळ भारतातच नाही तर विदेशात ही बसत आहे. फ्रान्स मधील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत कारण हंगामातील सरासरी अधिक तापमान वाढीमुळे वेळे आधी स्ट्रॉबेरी पिकत आहे.
बदलत्या हवामानाचा परिणाम फक्त शेतीच नाही तर पशुसंवर्धनावर ही होत आहे. वाढत्या तापमानामुळे जनावरमधील प्रजनन क्षमता कमी होणे, दूध उत्पादन कमी होणे, चारा उत्तपदानात घट या कारणांमुळे दुग्धव्यवसाय ही अडचणीत येत आहे.
येणाऱ्या काळात कृषी, अन्नपुरवठा व अन्नसुरक्षेवर बदलत्या हवामानाचा विपरीत परिणाम वाढू शकतो, यासाठी पीक व्यवस्थापन, पशुपालन पद्धती मध्ये बदल, सिंचन पद्धती मध्ये सुधारणा यासारखे पर्याय शेतीला काही प्रमाणात मदत करतील, परंतु वातावरणीय बदलासाठी ठोस उपाययोजना करणे आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे ही काळाची गरज आहे.
0 Comments
या वेबसाइटवरील मत हे वैयक्तिक असून यातून कोणाच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न केला गेला नाही.
या वेबसाइटवरील महितीची सत्यता दुसरीकडून पडताळून पहावी.